वॉशिंग्टन, १८ ऑगस्ट – अमेरिका दररोज भारत-पाकिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विधान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी केले. रविवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा या दोन शेजारी देशांमधील अणु तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला.
रुबिओ म्हणाले की, युद्धविराम कोणत्याही क्षणी तुटू शकतो, त्यामुळेच अमेरिकेचा भर कायमस्वरूपी समाधानावर आहे. “युद्धविराम टिकवून ठेवणं हीच सर्वात कठीण गोष्ट आहे. आम्ही भारत-पाकिस्तान तसेच कंबोडिया-थायलंडसह अनेक ठिकाणच्या घडामोडींवर दररोज लक्ष ठेवतो. स्थायी युद्धविराम आमचे ध्येय आहे. एक शांती करार झाल्यास भविष्यातही युद्ध होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत भारताने वारंवार अमेरिकेच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. भारताचे म्हणणे आहे की, शस्त्रसंधीविषयी चर्चा केवळ पाकिस्तानसोबतच झाली होती आणि ती मागणी इस्लामाबादकडूनच आली होती. मात्र पाकिस्तानने मात्र ट्रम्प यांच्या दाव्याला पाठिंबा दर्शविला आहे.
रुबिओ यांनी अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षाचा उल्लेख करताना म्हटले की, ट्रम्प यांनी अनेक वेळा हस्तक्षेप करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. “आम्ही भाग्यवान आहोत की अशा राष्ट्रपतींचे नेतृत्व आपल्याला लाभले आहे, ज्यांनी शांतता आणि सलोखा हेच त्यांच्या प्रशासनाचे प्राधान्य ठरवले. हेच आपण कंबोडिया-थायलंड, भारत-पाकिस्तान, तसेच रवांडा आणि काँगोमध्येही पाहिले आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रत्येक संधीचा पाठपुरावा करत राहू,” असे रुबिओ यांनी सांगितले.