इस्लामाबाद, १८ ऑगस्ट – पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तानच्या तुलनेत केलेल्या “मर्सिडीज-डंप ट्रक” या वक्तव्याला आता गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी दुजोरी दिली आहे. फ्लोरिडामधील एका कार्यक्रमात मुनीर यांनी भारताला मर्सिडीज आणि पाकिस्तानला खडीने भरलेला डंप ट्रक असे संबोधले होते.
नकवी यांनी सांगितले की, भारतासोबत तणावाच्या काळात सौदी अरेबियाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मुनीर यांनी सौदी प्रतिनिधीसमोर ही तुलना करत म्हटले की, “धडकेत जास्त नुकसान कुणाचे होईल ते तुम्हीच ठरवा.” नकवी यांनी हे वक्तव्य पाकिस्तानच्या ताकदीचे प्रतीक म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानमध्ये याचे उलट परिणाम झाले.
सोशल मीडियावर अनेकांनी या विधानाची खिल्ली उडवली. युजर्सनी टोमणे मारत म्हटले की, स्वतःला ट्रक म्हणत मुनीर आणि नकवी यांनी पाकिस्तानची दयनीय अवस्था मान्य केली आहे. अनेकांनी याकडे आत्मग्लानी आणि अपयशाचे प्रतीक म्हणून पाहिले.
ही वादग्रस्त वक्तव्ये अशा वेळी आली आहेत जेव्हा एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. ७ ते १० मेदरम्यान चाललेल्या या कारवाईत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्य साधले. पाकिस्तान सरकार व लष्कर वारंवार नुकसान न झाल्याचे सांगत असले तरी त्यांच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये त्यांच्या कमजोरी उघड करत असल्याचीच चर्चा आहे.