सोलापूर, 18 ऑगस्ट – पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा जिव्हाळ्याचा आणि अजेंडावरील तब्बल २० कोटींचा प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रखडला आहे. जागा उपलब्ध असूनही तिच्या मालकीसंबंधी कागदपत्रांचा दाखला न मिळाल्याने हा प्रकल्प पुढे सरकलेला नाही.
उमेद मॉलसाठी प्रस्तावित जागेच्या निर्विवाद मालकीचा दाखला दोन दिवसांत उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. मात्र, संबंधित फाईल गायब झाल्याने महसूल व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विजयपूर महामार्गावरील आयटीआय कॉलेजजवळ ग्रामीण विकास यंत्रणेची दोन एकर जागा आहे. १९९५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जागा प्रशिक्षण केंद्रासाठी दिली होती, तर १९९७ मध्ये त्याची कायदेशीर नोंदणी झाली. उपलब्ध कागदपत्रांनुसार व पडझड झालेल्या इमारतीच्या आधारे महापालिकेच्या कर विभागाकडे या जागेची नोंद करण्यात आली होती.
गेल्या दोन दशकांपासून प्रशासनाने या जागेकडे दुर्लक्ष केले. याच ठिकाणी ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय झाला होता. यासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली होती.