सोलापूर, 18 ऑगस्ट – कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी सोडतीद्वारे लाभार्थी निवडून दीड महिना उलटला असला तरी लाभार्थ्यांना अजूनही महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करता आलेली नाहीत. तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, शेततळे अस्तरीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे अशा विविध योजनांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील साडेसात हजार शेतकऱ्यांची सोडतीद्वारे निवड झाली होती. त्यानंतर लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचा संदेश मोबाईलवर मिळाला.
मात्र, पोर्टल सुरू न होणे, कागदपत्रे अपलोड न होणे यांसारख्या अडचणींमुळे प्रक्रिया अडकली आहे. शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तक्रारी दाखल केल्या असल्या तरी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे