नवी दिल्ली, 19 ऑगस्ट – भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात सोमवारी बहुतेक ठिकाणी पाऊस झाला नाही. अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस दरम्यान नोंदले गेले. हवामान विभागानुसार पुढील तीन दिवस उकाडा कायम राहील, मात्र २३–२४ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसानंतर दिलासा मिळू शकतो. बिहारमध्ये गेल्या २४ तासांत ७ ते १० सेंमी पाऊस झाला आहे. तरीही दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हिमालयीन राज्य उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. पुढील ७ दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा आहे.
ओडिशा आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागात मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि बिहारमध्ये १८ ते २४ ऑगस्टदरम्यान पाऊस सुरू राहणार आहे. हवामान विभागाने १९ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा, तर १९ आणि २० ऑगस्ट रोजी गुजरातमध्ये भीषण पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
