बीड, 20 ऑगस्ट – बीड जिल्ह्यातील वडवणी स्थानिक न्यायालयात बुधवारी सकाळी सरकारी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत वकिलाचे नाव विनायक लिंबाजी चंडेल (वय 48) असे आहे. ते वडवणी न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालय परिसरातील एका खोलीत त्यांनी खिडकीला दोरी बांधून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह बीडच्या सरकारी रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास करत असून, कोणतीही सुसाइड नोट आढळली आहे का याची चौकशी सुरू आहे.
विनायक चंडेल हे कार्यक्षम वकील म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने वकील समुदाय आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. न्यायालय परिसरातच अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
