अमरावती, २१ ऑगस्ट: प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शासनाने केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. चालू वर्षी शासनाने सुधारित योजना लागू करून शेतकऱ्यांचा हिस्सा अनिवार्य केला असून नुकसानभरपाईच्या पद्धतीतही बदल केला आहे. यामुळे तिवसा तालुक्यातील फक्त ३०% शेतकऱ्यांनीच विमा घेतलेला आहे.
सुधारित योजनेनुसार, खरीप हंगामासाठी २%, रब्बी हंगामासाठी १.५% तर नगदी पिकासाठी ५% हिस्सा आता शेतकऱ्यांना भरावा लागतो. याशिवाय, आता नुकसानभरपाई वैयक्तिक तक्रारीऐवजी पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन यावर आधारित दिली जाणार आहे. अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत वैयक्तिक दावा करण्याची सोय आता उपलब्ध नाही.
तिवसा तालुक्यात एकूण ९,२३८ शेतकऱ्यांनीच विमा घेतलेला असून, कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा आणि वरखेड या महसूल मंडळांत सहभागी शेतकऱ्यांची संख्या अपुरी आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांमुळे योजनेचा लाभ मिळवणे कठीण झाले आहे.