पुणे, २३ ऑगस्ट: रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या २०२५ साठी प्रस्तावित ४१ प्रभाग रचनेवर तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही रचना भाजपच्या विद्यमान उमेदवारांसाठी सोयीस्कर करण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या सूचनांचा उघड उल्लंघन केला आहे.
डंबाळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करून प्रभाग रचना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नद्या, नाले आणि महामार्ग यांसारख्या नैसर्गिक सीमारेषांचा विचार न करता ही रचना केल्याने अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्यांनी ही रचना “मतदार चोरीचा प्रकार” असल्याचे सांगितले आणि याविरुद्ध व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचे जाहीर केले. भाजपविरोधी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये या रचनेविरुद्ध नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.