मुंबई, 23 ऑगस्ट – राखीला जात, धर्म, प्रांत, भाषा असा भेद नसून ती निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक आहे. आम्ही परिवार आणि कुटुंब मानणारे लोक आहोत. भाजपात काम करताना आपण बृहद कुटुंबाचा विचार करणारे आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस विशेष उपस्थित होते. राज्यभरातून महिलांनी पाठवलेल्या हजारो राख्या यावेळी त्यांना प्रदान करण्यात आल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महिला मोर्चा अध्यक्षा आमदार चित्रा वाघ, मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, ज्ञानेश्वरांचा विचार सांगणारे आपण आहोत. बहिणींच्या आशीर्वादापेक्षा मोठं शस्त्र नाही. त्यांच्या आशीर्वादामुळेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. अनेक योजना निवडणुकीनंतर बंद होतील असं म्हटलं जात होतं, मात्र त्या पाच वर्षही सुरू राहतील आणि पुढील सरकार आलं तर पुढील पाच वर्षेही सुरू राहतील.
‘लखपती दीदी’ कार्यक्रमाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र या उपक्रमात पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 25 लाख महिला लखपती दीदी झाल्या असून हा आकडा एक कोटींपर्यंत नेण्याचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पुढे आला असून, महिलांना स्वावलंबी बनवण्याचा हेतू आहे.
महिला केंद्रीत विकासाच्या माध्यमातून देश पुढे जात असल्याचं ते म्हणाले. “आमच्या भगिनी घरात बसणाऱ्या नाहीत, तर देशाच्या विकासात सक्रियपणे सहभागी होत आहेत. संसद, विधानसभेत महिलांना स्थान मिळालं आहे. नारीशक्ती थांबणार नाही, त्यामुळे देशाची प्रगती अडवणं शक्य नाही,” असं ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, जगातील विकसित देशांनी महिलांच्या सहभागातून अर्थव्यवस्थेत गती आणली. भारतही त्याच मार्गावर चालत आहे. पुढील 20 वर्षांत भारत जगातील पहिली किंवा दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि त्यात महिलांचा मोठा वाटा असेल.