अमरावती, २५ ऑगस्ट: मेळघाटातील कुलांगणा (खुर्द) गावातील एका वस्तीत ४० घरे आजही वीजपुरवठ्याशिवाय अंधारात जगत आहेत. गेल्या ५० वर्षांपासून वीज नसल्यामुळे तिसऱ्या पिढीचे जीवन अक्षरशः काळोखात गेले आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, आजवरचे सर्व लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनच देत आले आहेत. वीज नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. मुलांना कंदील आणि चुलीच्या उजेडात अभ्यास करावा लागतो.
ग्रामस्थ २९ ऑगस्ट रोजी परतवाडा येथील महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहेत. त्यांनी ठोस निर्णय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.