नवी दिल्ली, 25 ऑगस्ट – हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतातील चार प्रमुख राज्यांमध्ये – राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश – मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजस्थानातील १३, उत्तराखंडातील ७, हिमाचल प्रदेशातील ५ जिल्ह्यांमध्ये तसेच जम्मू विभागातील सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राजस्थानातील गंभीर परिस्थिती
गेल्या तीन दिवसांपासून कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, जयपूर आदी ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. सवाई माधोपूरमध्ये ५० फूट जमिनीचा भाग पाण्याखाली गेला आहे. सिकर जिल्ह्यात धरण फुटल्याने महामार्गावर १० किमीपर्यंत पाणी साचले. झालावाडमध्ये कार वाहून गेल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता आहेत. नागौरमध्ये जुने घर कोसळले, शेतांची धूप झाली. आतापर्यंत राज्यात ९३ जणांचा मृत्यू झाला असून, ४६ जण पूरात बुडाले आणि २४ जण वीज कोसळून मृत्युमुखी पडले. एसडीआरएफ-एनडीआरएफची पथके तैनात असून ७९२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश
जम्मू विभागात सर्व सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, दहावी-अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची शक्यता वाढली आहे. आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीला पूर
दिंडोरी जिल्ह्यात नर्मदा नदीला पूर आला असून अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. मांडला येथे पूल वाहून गेला आहे. राज्यात सध्या तीन हवामान प्रणाली सक्रिय असून पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे.
उत्तर प्रदेशात धरण फुटल्याने हाहाकार
चांदौली जिल्ह्यातील मुसाहिबपूर धरण फुटल्याने पाच गावांत पाणी शिरले. नागरिकांचे स्थलांतर सुरू असून, प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केल्या आहेत.
हवामान विभागाने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानात २७ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. पूर, भूस्खलन आणि धरण फुटण्यामुळे शेकडो कुटुंबांचे विस्थापन झाले असून, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.