मुंबई, २५ ऑगस्ट. मरीन ड्राईव्ह परिसरातील नरिमन पॉइंटजवळ सोमवारी सकाळी समुद्रात एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणीची ओळख मनिता गुप्ता अशी करण्यात आली आहे.
Heading: मरीन ड्राईव्हवर तरुणीचा मृतदेह; आत्महत्या की खुनाचा शंका
कफ परेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिता गुप्ता रविवारपासून (२४ ऑगस्ट) बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच सोमवारी तिचा मृतदेह समुद्रात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृतदेह सापडला तेव्हा मनिताने काळा टी-शर्ट परिधान केलेला होता. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा आहे की, तिच्यासोबत घातपात झाला आहे, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गर्दीने गजबजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांतही मोठी खळबळ उडाली आहे.