इस्लामाबाद, २६ ऑगस्ट। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानातील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने सोमवारी इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ९ मे २०२३ रोजी झालेल्या दंगलीदरम्यान सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून ३ ते १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘फैसलाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएनएल -एन) चे पंजाब प्रदेशाध्यक्ष राणा सनाउल्लाह यांच्या घरावर हल्ला केल्याच्या प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे ५९ नेते आणि कार्यकर्त्यांना प्रत्येकी १० वर्षे आणि इतर १६ जणांना प्रत्येकी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, ३४ लोकांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.’’
अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणात एकूण १०९ आरोपी होते, ज्यापैकी ७५ जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रीय असेंब्लीचे माजी विरोधी पक्षनेते उमर अयूब, सिनेटमधील माजी विरोधी पक्षनेते शिबली फराज, माजी संसद सदस्य जरताज गुल, अहमद चट्ठा, अशरफ खान सोहना, आणि माजी गृहमंत्री शेख रशीद यांचे भाचे शेख रशीद शफीक तसेच कंवल शौजाब यांचा समावेश आहे.
याआधीही या नेत्यांना फैसलाबादमधील आयएसआय भवनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी १०-१० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्या दोन्ही प्रकरणातील शिक्षा एकत्रितपणे भोगाव्या लागतील.
अधिकाऱ्याने सांगितले की माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचे पुत्र झैन कुरेशी यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
इम्रान खान यांच्या अटकेच्या विरोधात ९ मे २०२३ रोजी त्यांच्या समर्थकांनी हिंसक निदर्शने केली होती आणि अनेक लष्करी तसेच शासकीय इमारतींमध्ये तोडफोड केली होती. ही हिंसा मुख्यतः पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाली होती. दरम्यान, पीटीआय पक्षाने या निर्णयाची तीव्र निंदा केली असून म्हटले आहे की, या निर्णयाचे आधार फसवे खटले आणि खोटे साक्षीदार आहेत.