वाराणसी : कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेकडून आता पडदा टाकण्यात आला असला तरी याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. बिहार आणि हिमाचल प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशातूनही शिवसेनेवर टीका टिपण्णी सुरु झाली आहे. या वादावर वाराणसीत कायद्याचे ज्ञान असणा-या अतिशहाण्या वकिलाने वादग्रस्त पोस्टर झळकवले आहे. यावर टीकाही होत आहे.
महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगावरील या पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हा खोडसाळपणा केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात भाष्य करताना कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबई असुरक्षित वाटत असेल तर सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कंगनानेही त्यांना ट्विटद्वारे आव्हान दिलं होतं. दरम्यान, बुधवारी बीएमसीनं कंगनाच्या पालीहिल्स येथील कार्यालयाच्या काही बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली होती.
बीएमसीच्या कारवाईनंतर भडकलेल्या कंगनाने एका व्हिडिओ मेसेजद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळत चालल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला यापुढे या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसून कंगनापेक्षा सध्याची कोरोनाची परिस्थिती जास्त महत्वाची असल्याचं म्हटलं आणि या वादावर पडदा टाकला आहे.
* मोदीच संरक्षण करु शकतात
वादग्रस्त पोस्टरबाबत सांगताना वकील श्रीपती मिश्रा म्हणाले, “कंगना आणि शिवसेना वादामध्ये महाराष्ट्र शासन कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीचं देशातील महिलांचा आत्मसन्मानाचं संरक्षण करु शकतात.” या वादावर शांत राहिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली आहे.