मुंबई, २८ ऑगस्ट. आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. १४ टक्के आरक्षण दिलं, मराठा आर्थिक विकास महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं. पण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. आरक्षण घालवण्याचं पाप उद्धव ठाकरेंचं आहे, असा घणाघाती हल्ला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी चढविला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
संजय राऊत यांनी सामनामध्ये मराठा मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणत व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांची आरक्षणावर बोलण्याची पात्रता नाही, आधी त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही बन यांनी केली.
बन यांनी पुढे सांगितले की, “औरंगजेब फॅन क्लब प्रवक्ते पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करतात, पण महाराष्ट्राची जनता जाणते की महायुती सरकारने दिलेलं आरक्षण मविआ सरकारमुळेच गेलं होतं. म्हणूनच राऊत यांनी आरक्षणावर बोलण्याआधी जनतेची माफी मागावी. इतर एकाही मुख्यमंत्र्याला मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे, याची आठवणही बन यांनी करून दिली.
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना बन म्हणाले, “संजय राऊत यांची परंपरा कुबुद्धीची आहे का? देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या परंपरेवर बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही. गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की सकाळी उठून बडबड करण्याची कुबुद्धि त्यांना देऊ नये.”
जनतेने घरी बसवल्यानंतरच दोडका भाऊ लाडका झाला
मनसे-उबाठा मनोमिलनाबाबतही बन यांनी राऊतांना चिमटा काढला. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत जनतेने दारुण पराभव केल्यानंतर तुम्हाला एकेकाळच्या दोडक्या भावाची आठवण झाली. महापालिका निवडणुकीतही मतदार घरी बसवतील या भीतीमुळेच हा दोडका भाऊ आज लाडका भाऊ झाला आहे. २०१४ आणि २०१९ ला राज ठाकरेंनी युतीसाठी पुढे केला पण तुम्ही त्यांच्यासोबत गेला नाहीत. मात्र, आता जनतेने घरी बसवल्यानंतर आणि आपलं दुकान बंद होऊ लागल्यानंतर भाऊ आठवला आहे. आगामी काळातही दोन भाऊ एकत्र राहावेत ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत, असेही बन यांनी नमूद केले.