नवी दिल्ली, 28 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टपासून तियांजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेसाठी चीनला जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत रविवारी (३१ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोदी-जिनपिंग भेट भारत-चीन संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
भारत-चीन संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले असले तरी मोदींच्या या दौऱ्यामुळे सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अलीकडेच चीनने भारताला बोगदा खोदणी यंत्रांसह रेअर अर्थ मटेरियल पुरवण्याचे आश्वासन दिले आहे.
भारत आणि चीन यांच्यात १९५० मध्ये औपचारिक राजनयिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र, १९६२ मधील युद्धामुळे संबंध ढासळले. त्यानंतर राजीव गांधी (१९८८), अटलबिहारी वाजपेयी (२००३) यांच्या दौऱ्यांनी संबंध सुधारले. २०१४ मध्ये शी जिनपिंग यांचा भारत दौरा आणि २०१५ मधील मोदींचा चीन दौरा यामुळे “विकासात्मक भागीदारी” दृढ झाली. २०१८ वुहान आणि २०१९ चेन्नई शिखर परिषदेत अनौपचारिक चर्चांमुळे परस्पर विश्वास वाढला. तथापि, २०२० मध्ये लडाखमधील तणावामुळे संबंध ताणले गेले. मात्र, २०२४ मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान मोदी-जिनपिंग भेटीनंतर संबंध पुन्हा सुधारू लागले.
भारत-चीन जवळीक अमेरिकेसाठी धोक्याची ठरू शकते. ट्रम्प यांनी भारतावर नाराजी व्यक्त करत ५०% आयात शुल्क लावले, तर चीनला काही प्रमाणात सूट दिली होती. त्यामुळे मोदींचा हा दौरा ट्रम्पसाठी अस्वस्थ करणारा ठरू शकतो.
