नवी दिल्ली, २८ ऑगस्ट : अमेरिकेने अलीकडेच भारतीय वस्तूंवर लावलेल्या जास्तीच्या आयात शुल्काला (टॅरिफ) भारतीय व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) संधी म्हणून पाहिले आहे. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, व्यापार करण्यासाठी फक्त अमेरिका एकमेव पर्याय नाही. संपूर्ण जग भारतीय व्यापारासाठी खुले आहे.
भारतिया म्हणाले की युनायटेड किंगडम, युरोप, दक्षिण आफ्रिका, आशियाई देश, लॅटिन अमेरिका, संयुक्त अरब अमिरात (यूएई) या सर्व ठिकाणी भारतीय व्यापाऱ्यांसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. “भारतीय व्यापारी कोणत्याही अडथळ्यांना घाबरत नाहीत. प्रत्येक नवीन आव्हान एक नवीन संधी घेऊन येते. अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयाकडे आपण एका सकारात्मक वळणासारखे पाहत आहोत, जे आपल्या व्यापाराच्या व्याप्तीत भर घालेल,” असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भारतिया म्हणाले की, “हा टॅरिफ आमच्यासाठी एक वरदान ठरेल. भारतीय व्यापारी या आव्हानाला ऐतिहासिक संधीमध्ये रूपांतरित करण्यास कटिबद्ध आहेत. भारताचा व्यापार आणि उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे उभा आहे.”
‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने वाटचालसीएआयटीचे राष्ट्रीय महामंत्री आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनीही असेच मत मांडले. ते म्हणाले, “ही वेळ संकटाची नाही, तर आपल्या व्यापाराचा विस्तार करण्याची आहे.” त्यांनी यावर भर दिला की ही परिस्थिती आपल्या व्यावसायिक क्षितिजांचा विस्तार करण्याची एक अनोखी संधी आहे.
प्रविण खंडेलवाल यांनीही इतिहासाचा दाखला देत सांगितले की, “भारतीय व्यापार ही आपल्या संस्कृतीतील मुळापासून रुजलेली परंपरा आहे. सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीपासून भारत जागतिक व्यापाराचे केंद्र राहिले आहे. कोणताही अडथळा भारतीय व्यापाऱ्यांना रोखू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले की, “युरोपियन युनियन, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात भारतीय व्यापारासाठी अफाट संधी उपलब्ध आहेत. कोविड-१९, आर्थिक मंदी, किंवा नैसर्गिक आपत्ती – या सगळ्या संकटांनंतर भारतीय व्यापाराने आपली ताकद दाखवून दिली आहे. अमेरिकेचा हा टॅरिफ निर्णयसुद्धा फक्त आणखी एक पायरी आहे.”
खंडेलवाल यांनी नमूद केले की, भारतातील ९ कोटी व्यापाऱ्यांचे दृढ निश्चय आणि उद्योजकता देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. देशातील जीडीपी आणि रोजगार निर्मितीत यांचा मोठा वाटा आहे. आजचा व्यापारी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून, नव्या रणनीती आखून, आपली पुरवठा साखळी मजबूत करत नव्या बाजारात शिरण्यास सज्ज आहे.
सीएआयटीने भारत सरकारला युरोप, आफ्रिका आणि आशिया-पॅसिफिक देशांबरोबर व्यापारविषयक संवाद वाढवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भारतीय व्यापाऱ्यांना अधिक विस्तृत बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल.
