मुंबई, ३१ ऑगस्ट. मनोज जरांगे यांचा इतिहास दंगलीचा असून ते लोकशाही न मानणारे आहेत. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी ते सुपारी घेऊन आंदोलन करत आहेत. जरांगे हे शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या छुप्या मदतीने आरक्षणाच्या नावाखाली अराजकता माजवत आहेत, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला. शरद पवार यांचे जवळचे मानले जाणारे राजेश टोपे हे रात्री उशिरा जरांगे यांच्या गोधडीत भेटायला गेले होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु केले असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर हाके यांनी जरांगे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली.
ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे सांगत हाके म्हणाले की, पंचायत राज संस्थांमधील आरक्षण जरांगे यांच्या आंदोलनामुळे धोक्यात आले आहे. “हा माणूस झुंडशाही करत असून एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागत आहे. संविधान, न्यायालय आणि शासन प्रशासन न मानणारा जरांगे लोकशाहीच्या विरोधात काम करत आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
हाके यांनी शरद पवारांनाही लक्ष्य केले. “आपण सत्तेत असताना मराठा समाजाला न्याय देण्याचा विचार का केला नाही? उगीच वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रकार करू नका,” असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्रात आधीच ७२ टक्के आरक्षण दिले जात असून तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आहे. अशा परिस्थितीत घटनादुरुस्तीची भाषा करून पवार साहेब जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप हाकेंनी केला.
राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने जरांगे यांना मुंबईत येण्याची परवानगी देऊन मोठी चूक केली असून आता त्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरले आहे, असे हाके म्हणाले. “मुख्यमंत्री साहेब, अजून वेळ गेलेली नाही. या जरांगेला आटोक्यात आणा, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,” असा इशारा हाकेंनी दिला.
ओबीसी समाजाचे आरक्षण संपवण्याचा डाव शरद पवार आणि त्यांचे समर्थक रचत असून रोहित पवार यांच्या आयटी सेलमार्फत जरांगे यांच्या आंदोलनाला रसदपुरवठा केला जात असल्याचा आरोप हाकेंनी केला. “मनोज जरांगे याला गोरगरीब मराठ्यांशी काही देणंघेणं नाही. त्याला फक्त पंचायत राज संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिसत आहेत. ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी त्याने घेतली आहे,” असा थेट आरोप करत हाकेंनी सरकारलाही इशारा दिला की, जरांगेच्या झुंडशाहीपुढे हतबल होऊ नका.