वॉशिंग्टन, २ सप्टेंबर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (१ सप्टेंबर) चीनमध्ये शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) दरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. या दोघांमध्ये एक विशेष बैठकही झाली. या घटनेमुळे अमेरिका नाराज झाला असून अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने रशियासोबत नव्हे तर अमेरिकेसोबत राहायला हवे.
मीडिया रिपोर्टनुसार पीटर नवारो म्हणाले, “भारताने आमच्यासोबत राहायला हवे, रशियासोबत नाही. पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासोबत काम करत आहेत, हे लाजिरवाणे आहे.” नवारो यांची ही टिप्पणी पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आली. पंतप्रधान मोदींनी आपल्या चीन दौऱ्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभाग घेतला आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय भेट घेतली. यामुळे अमेरिका नाराज झाला आहे.
जेव्हापासून राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारतावर आपला टॅरिफ बॉम्ब टाकला आहे, तेव्हापासून व्हाइट हाऊसचे व्यापार सल्लागार वारंवार नवी दिल्लीने मॉस्कोसोबत सुरू ठेवलेल्या कच्च्या तेलाच्या व्यापारावर टीका करत आहेत. त्यांनी असा आरोप केला आहे की, तेल खरेदीतून मिळालेल्या पैशांचा वापर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन युक्रेनमधील युद्धासाठी करत आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे की, हा एक असा लष्करी संघर्ष आहे, ज्याबाबत ट्रम्प यांनी सांगितले होते की, ते राष्ट्रपती झाल्यावर काही तासांतच हे युद्ध संपवतील. मात्र सहा महिने उलटून गेल्यानंतरही ते हे युद्ध थांबवण्यात अपयशी ठरले आहेत.
त्यांच्या आधीच्या वक्तव्यांमध्ये नवारो यांनी भारताला “टॅरिफचा महाराजा” असे संबोधले होते. त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाला “मोदीचे युद्ध” असे म्हटले होते आणि भारतावर रशियासाठी मनी लॉन्ड्रिंग करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर त्यांनी हेही म्हटले की, भारत रशियाकडून जे तेल खरेदी करत आहे, त्याचा फायदा फक्त ब्राह्मण (अमेरिकेच्या संदर्भात उच्चभ्रू वर्ग) घेत आहेत.
