छत्रपती संभाजीनगर, 2 सप्टेंबर – मराठवाड्यातील माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील नागदरा हे त्यांचे मूळ गाव असून, ते अनेक वर्षांपासून अंबाजोगाईत वास्तव्यास होते. त्यांनी परभणी, लातूर आणि बीड येथे सेवा बजावली होती. लातूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पदभार त्यांनी सांभाळले होते. बीडला बदली झाल्यानंतर त्यांच्यावर एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले. परभणीतील एका प्रकरणामुळे एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर ते नैराश्यात असल्याचे सांगितले जाते.
मुले पुण्यात शिक्षण घेत असल्याने त्यांची पत्नी मुलांसोबत पुण्यात होती, तर नागरगोजे अंबाजोगाईत सुरू असलेल्या घराच्या बांधकामामुळे भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.