मुंबई, २ सप्टेंबर – मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीत जरांगे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी जोरदार युक्तिवाद केला. कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याचं आवाहन करण्यात आल्याचे सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात सांगितले. यानंतर उच्च न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब करत उद्या, बुधवारी दुपारी एक वाजता सुनावणी निश्चित केली आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज सकाळच्या टप्प्यात एक सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, असे निर्देश राज्य सरकार आणि आंदोलकांना दिले. सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नसल्याचे म्हणत मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही, आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत, अशा शब्दात पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
आजच्या सुनावणीत मराठा आंदोलकांच्या बाजूने सतीश मानेशिंदे, तर राज्य सरकारकडून बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. यावेळी मराठा आंदोलक हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. आंदोलनकर्त्यांना केवळ आझाद मैदानात थांबण्याची परवानगी होती. मात्र, या नियमाचे उल्लंघन झाले, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ चोवीस तासांची परवानगी दिली होती. मग तुम्ही तिथे अजून का थांबला आहात?, असा सवाल उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. यावर आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत, असा जरांगेंच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. तसेच आतापर्यंत ५४ मोर्चे शांततेत झाले आहेत, असे वकील मानेशिंदे यांनी सांगितले. यावर तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात, तुम्हाला परवानगी नाही, असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर वकील मानेशिंदे यांच्याकडून उद्यापर्यंतचा वेळ मागण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी उद्यात तहकूब केली आहे.
युक्तिवाद करताना जरांगेंचे वकील मानेशिंदे यांनी सांगितले की, सगळ्याच गाड्या बाहेर पाठवण्याच्या सूचना जरांगेंनी मराठा आंदोलकांना दिल्या आहेत. दरम्यान मराठा आंदोलकांनी न्यायालयात आपली भूमिका मांडताना सांगितले की, आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय केलेली नव्हती, पाच हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली, पण पाचशे लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही, मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली, आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी म्हटले आहे की, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंच देखील इथून हटणार नाही. जोपर्यंत आमचे मनोज दादा इथे बसलेले आहे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तीन वाजो, पाच वाजो, कितीही दिवस लागो, जोपर्यंत आमचे दादा इथे आहे तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो, असे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.