पुणे, 4 सप्टेंबर।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जूनमध्ये राबवण्यात आलेल्या भरतीनंतर आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यासाठी १३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठाने जूनमध्ये कंत्राटी तत्त्वावर १३३ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी प्रक्रिया राबवून ८६ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत ५२ जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार खुल्या गटासाठी ३३, महिलांसाठी १७, तर क्रीडा आरक्षणासाठी दोन जागा उपलब्ध आहेत.
जैवतंत्रज्ञान, ऊर्जा अभ्यास, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, आरोग्यशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणशास्त्र, गणित, सूक्ष्मजीवशास्त्र, मानवशास्त्र अशा विविध विभागांमध्ये मिळून ५२ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना प्रति महिना (एकत्रित) ४० हजार रुपये मानधन मिळणार आहे. तसेच ही निवड ३१ मे २०२६ पर्यंत ग्राह्य धरली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.