सोलापूर / पंढरपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुराती स्थगिती दिली आहे. यावर मराठा समाजातील विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
पंढरपूर येथे आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा विरोध करणाऱ्या फलकाचे दहन करून आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सोलापूर येथेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून राज्य सरकारचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे. शहरात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी आज सोलापूर-पुणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून टायर जाळण्यात आले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षासाठी स्थगिती दिली आहे. आता राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. सोलापुरात आरक्षणासाठी अवंतीनगर येथे पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने हे आंदोलन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, अशा घोषणांनी अवंतीनगर परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आंदोलकांना तत्काळ ताब्यात घेत चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सोलापूरमध्ये मराठा आंदोलन पेटलेसर्वोच्च न्यायालयाने सन चालू वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजातील मुलांना शिक्षण क्षेत्रात आणि नोकरी भरतीवेळी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
या निकालामुळे सध्या महाराष्ट्रभर मराठा समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सोलापुरात अवंतीनगर पाण्याच्या टाकीजवळ मराठा समाजातील युवकांनी टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त असल्याने पोलिसांनी त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यभर ठिकठिकाणी विरोधाला सुरुवात झाली आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव, समन्वयक किरण पवार, अजिंक्य पाटील, निखिल थोरात, राहुल दहीहंडे, सौदागर क्षीरसागर आदी उपस्थित होते. पंढरपूर येथे करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आकाश पवार, संदीप मुटकुळे, शहाजी शिंदे, गणेश चव्हाण, नीलेश गंगथडे, बापू चौधरी आदींसह मराठा समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. गुरुवारी लातूर जिल्ह्यात आरक्षण स्थगितीमुळे एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशनकरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.