पालघर, 4 सप्टेंबर। मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर मार्फत सुरू करण्यात आलेले ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियान अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत शेकडो आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, वसई-विरार शहर महानगरपालिका रुग्णालये तसेच विविध खासगी रुग्णालये यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ घेताना आतापर्यंत हजारो नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या असून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे अभियान खऱ्या अर्थाने आशीर्वाद ठरत आहे.
‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानाद्वारे नागरिकांना मोफत तपासणी, निदान, सल्ला व उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, आरोग्यविषयक जागरूकतेत मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पालघर तर्फे हे अभियान पुढील काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृपेश बाबरेकर यांनी केले आहे.