पालघर, 4 सप्टेंबर। शासनाने मराठा समाजाकरिता काढलेल्या जीआरच्या अनुषंगाने ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये तसेच ओबीसी समाजाचे असलेले आरक्षण अबाधित राहावे, या मागणीसाठी ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी समितीच्या प्रतिनिधींनी पालघर जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. निवेदन देताना ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील, निमंत्रक कुंदन संखे, उपाध्यक्ष भालचंद्र ठाकरे, निवृत्त सनदी अधिकारी आर. डी. संखे, पी. टी. पाटील, अरविंद वर्तक, जितेंद्र राऊळ यांच्यासह समितीचे पदाधिकारी व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.