पुणे, 6 सप्टेंबर। पुण्यात आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आहे. यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला वेळेत सुरुवात व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र अजित पवार यांनी पुण्यात ऐन गणेशोत्सवात झालेल्या हत्या प्रकरणी आणि सोलापूरच्या महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबतच्या वादावर मौन बाळगलं.
विसर्जन मिरवणुकीबाबत सर्व मंडळांसोबत चर्चा केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आज विसर्जन मिरवणुकीचा उत्साहाचा दिवस आहे. गेल्या १० दिवसात पुण्यासह राज्यात कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलाय. यासाठी सर्वांनीच चांगलं सहकार्य केलं असंही अजित पवार म्हणाले.
पुण्यात ऐन गणेशोत्सवात टोळीयुद्धाचा भडका उडालाय. आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळीयुद्धात एका १९ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. वनराज आंदेकर यांची हत्या केल्यानंतर वर्षभरातच त्यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या आरोपीच्या मुलावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोविंदा कोमकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी अजित पवार यांना विचारलं असतं त्यावर उत्तर देणं टाळलं. कुठेही गालबोट न लागता मिरवणूक पार पडावी, बाप्पाकडे तुमच्या मनात जे आहे ते मागितलं असं त्यांनी सांगितलं.