नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : देशभरात मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागांपासून ते मैदानी प्रदेशांपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाचे अलर्ट सातत्याने खरे ठरत असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि पुराचा प्रकोप सुरू आहे. हवामान विभागाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तराखंडच्या नैनीताल आणि चंपावत जिल्ह्यांत भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमधील बांसवाडा, डूंगरपूर, प्रतापगड, सिरोही आणि उदयपूर जिल्ह्यांत पुराचा धोका वाढला आहे.
राजसमंद ते जोधपूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-162) पाण्याच्या प्रवाहामुळे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहून गेला असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे. जयपूर-केकडी महामार्ग मागील 4 दिवसांपासून बंद आहे. जयपूरमध्ये चार मजली मोडकळीस आलेल्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला, ज्यात पिता-पुत्रीचा मृत्यू, तर 5 जण जखमी झाले. कोटामध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
तसेच हिमाचल प्रदेशातील कुल्लू शहरात शनिवारी इनर अखाडा बाजार परिसरात मलब्यातून 4 मृतदेह सापडले. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नौगाव नगर पंचायत भागात ढगफुटीमुळे नाले उफाळून वाहू लागले. बाजार परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एका घराचे मोठे नुकसान झाले.
यासोबतच हरियाणामध्ये सलग पावसामुळे सुमारे 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेली आहे. ई-क्षती पोर्टलवर 3 हजार गावांमधील 1.7 लाख शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचा अहवाल नोंदवला आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील यमुना नदीचा पाण्याचा स्तर 207 मीटर खाली आला आहे, पण तो अजूनही धोक्याच्या 205.33 मीटरच्या स्तरापेक्षा अधिक आहे. सध्या 20 हजारांहून जास्त नागरिक राहत छावण्यांमध्ये राहत आहेत, जिथे पिण्याचे पाणी, अन्न, औषधे, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा तुटवडा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पंजाबमधील पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. त्यांच्या गुरदासपूर येथे सर्वप्रथम येण्याची शक्यता आहे, जिथे रावी नदीच्या पाण्याने मोठे नुकसान केले आहे. मोदी अमृतसर आणि तरनतारन जिल्ह्यांचा देखील हवाई पाहणी दौरा करू शकतात.
पंजाब सरकारला अद्याप अधिकृत दौऱ्याची माहिती मिळालेली नसली, तरी राज्याचे मुख्य सचिव के.ए.पी. सिन्हा यांनी पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याला दुजोरा दिला आहे