मुंबई, ७ सप्टेंबर : राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना उत्सवाला गालबोट देखील लागले. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी भाविक वाहून गेल्याच्या घटना घडल्या. तसेच मुंबईत शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील साकीनाका परिसरातील एका विसर्जन मिरवणुकीत हाय टेन्शन वायरमधून शॉक लागल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. श्री गजानन मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू असताना त्यांच्या ट्रॉलीला लटकलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागला. यात बिनू शिवकुमार (३६) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. टाटा पॉवर कंपनीची ११ हजार व्होल्टेजची वायर मिरवणुकीच्या ट्रॉलीला लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोललं जात आहे.
दुसरीकडे गणेश विसर्जनाच्या दिवशी विरारच्या मारंबळपाडा येथे गणेश विसर्जनादरम्यान खाडीत बुडणाऱ्या तीन भाविकांना स्थानिक मच्छीमार आणि रो-रो सेवेच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले. विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर एका कुटुंब आपला घरगुती गणपती विसर्जनासाठी गेले होते. यावेळी एका कुटुंबातील तीन सदस्य गणपती विसर्जनासाठी समुद्रात खोलवर गेले होते. पण समुद्राची खोली आणि पाण्याचा वेग लक्षात न आल्याने तिघेही समुद्राच्या खोल पाण्यात वाहत गेले.
विसर्जन दरम्यान शहापूरमध्ये (जि. ठाणे) तीन तरुण पाण्यात बुडाले आहे. आसनगाव येथील मुंडेवाडी या ठिकाणी राहणारे कुलदीप जाखेरे (32), दत्तू लोटे (30) आणि प्रतीक मुंढे (23) हे तीन तरुण गणपती विसर्जनासाठी भारंगी नदीत उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तीन तरुण बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरडा करून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही कळायच्या आत तिन्ही तरुण वाहून गेले.
चाकण परिसरात वेगवेगळ्या घटनात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना समोर आलीय. वाकी खुर्द येथील भामा नदीत दोन जण बिरदवडी येथील विहिरीत एक जण, शेलपिंपळगाव येथील भीमा नदीत एक जण अशा वेगवेगळ्या घटनात चार जण बुडाल्याची दुदैवी घटना घडली.
नांदेडमध्येही गणेश विसर्जनसाठी गेलेले 2 युवक नदीत बुडाले आहेत. नांदेड शहराजवळील गाडेगाव येथे ही घटना घडली. नदीपात्र भरून असल्याने युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. बालाजी उबाळे, योगेश उबाळे आणि शैलेश उबाळे हे तिघेजण पाण्यात वाहून जात होते. यावेळी शैलेश उबाळे याला वाचवण्यात यश आलं. पण बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे दोघेजण वाहून गेले. दोघांचे वय अवघे 18 ते 20 दरम्यान आहे.
धामणगांव रेल्वे तालुक्यातील वाघोली या गावात गणपती विसर्जनाला गालबोट लावणारी घटना घडली. करण चव्हाण या २२ वर्षीय युवकाचा विसर्जनाच्या वेळी पाय घसरून नदीत वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.