इस्लामाबाद, 7 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट मैदानावर हा स्फोट झाला.
पोलिसांनीही या स्फोटाची पुष्टी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा स्फोट आयईडीद्वारे करण्यात आला आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की, हा स्फोट जाणूनबुजून करण्यात आला होता आणि त्यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले होते. पण याबाबत कोणत्याही गटाने अजून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या महिन्यात सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन सरबकाफमुळे घाबरलेले दहशतवादी यासाठी जबाबदार आहेत. खैबर पख्तूनख्वा प्रांतात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान तीन दहशतवादी आणि एक पोलीस कर्मचारी मारला गेला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोहट जिल्ह्यातील लाची पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस चकमकीत तिन्ही दहशतवादी मारले गेले. दुसऱ्या एका घटनेत, लाची तहसीलमधील दारमलक पोलीस स्टेशनजवळ अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस व्हॅनवर हल्ला केला. ज्यामध्ये एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.