सोलापूर, 7 सप्टेंबर : सोलापूर जिल्हा परिषदेत जून 2019 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती मध्ये ग्रामपंचायत कोट्यातून चक्क शिपायांची पदही भरण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. वास्तविक ही पदे ग्रामपंचायत राखीव कोट्यातून भरता येत नाहीत. असे असताना जाणीवपूर्वक “मास्टरमाइंड’ने वरिष्ठांची दिशाभूल करून ही पदे भरल्याचे दिसून आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत कोरोना महामारी काळात करण्यात आलेल्या कर्मचारी भरतीतील घोटाळा सध्या राज्यात गाजत आहे. या भरतीत ग्रामपंचायत कोट्यातून भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये 55 पदे अधिक भरण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसा अहवाल तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे व विद्यमान सीईओ कुलदीप जंगम यांनी शासनाला दिला आहे. असे असताना हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र कर्मचारी युनियनने याला आव्हान दिले आहे. त्यामुळे यातील गंभीर बाबी आता चव्हाट्यावर आल्या आहेत. लक्ष्मी दर्शनासाठी जाणीवपूर्वक हा घोटाळा करणाऱ्या मास्टरमाइंडला बेड्या ठोका अशी आता कर्मचाऱ्यातून मागणी होत आहे.