कोलकाता, 07 सप्टेंबर : पश्चिम बंगालमध्ये आता भाषावादाने डोके वर काढले आहे. राजधानी कोलकाता येथे महापालिकेने दुकानांच्या पाट्या बंगाली भाषेतच असाव्यात असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे दुकानदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत पाट्या बदलण्याची मुदत देण्यात आली आहे.
यासंदर्भात महापालिकेने 30 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार कोलकाता शहरातील सर्व व्यावसायिक आणि वाणिज्यिक प्रतिष्ठाने त्यांच्या साइनबोर्ड्स आणि होर्डिंग्सवर बंगाली भाषेचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त धवल जैन यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार भाषिक अधिकारांना प्रोत्साहन देणे आणि समावेशिता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच कोलकाता येथील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठानांना 30 सप्टेंबरपर्यंत या आदेशाचे पालन करणे आवश्यक असल्याचे बजावण्यात आले आहे.