छत्रपती संभाजीनगर, 7 सप्टेंबर।
धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करावी, राजकारण करावे, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथील पत्रकार परिषदेत टीका केली.
मराठा आरक्षण संदर्भात सरकारने काम सुरू केले आहे. आमचे काम सुरू केले तर सरकारला आम्ही मोठेपण देऊ. तुम्ही जर आमचे काम केले तर आम्ही सरकारचे कौतुकच करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अंबानीच्या सुनेने मराठा बांधवांना त्रास दिला हे जर खरं असेल तर मग आम्ही अंबानी काय ते पाहणार नाही. माझ्या मराठ्याला त्रास दिला तर मोकळंच करील. अंबानी यांची सून काही तरी मराठा बांधवांना म्हणाली हे जर खरं असले ना तर मग आम्ही पाहणार नाही. मराठ्याच्या नादी लागायचे नाही. तुम्ही पाहूणे आहात मुंबईचे मालक आम्ही आहोत, असे म्हणत त्यांनी सुमोना चक्रवर्ती वर निशाणा साधला आहे.