नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : दलित राजकारणाच्या एकत्रिकरणासाठी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
एका मुलाखतीत आठवले म्हणाले की, भविष्यात दलित आघाडी स्थापन झाली, तर तिचे नेतृत्व मायावतींनी करावे. देशातील सर्वच राजकीय पक्ष आज बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. देशातील दलित नेते एकत्र आले, तर एखादा दलित पंतप्रधानही होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दलित एकतेसाठी ‘नॅशनल दलित फ्रंट’ सारखी मोहीम हवी. पूर्वी रामविलास पासवान, उदित राज आणि आठवले यांनी ‘नॅशनल दलित फ्रंट’च्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. दलित राजकारणाच्या एकतेसाठी मायावती एक पाऊल पुढे आल्या, तर मी 10 पावले मागे जाईन असे नमूद करत आठवले यांनी एकजुटीचे आवाहन पुन्हा केले.
लोकसभेत रिपाईचा एकही खासदार नसतानाही पंतप्रधान मोदींनी मला सलग तिसऱ्यांदा मंत्रीपद दिले. भाजप आणि एनडीएने मला मान दिला, त्यामुळे मी पक्ष देशभरात वाढवू शकलो असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी “प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपेल” या भाजप नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, “हा दावा तथ्यहीन आहे. प्रादेशिक पक्षांची गरज आणि अस्तित्व कायम राहिल असा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस सर्वसमावेशक नेते
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत आठवले म्हणाले की, “फडणवीस हे सर्व वर्गांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्या विरोधात कटकारस्थान सुरु आहे, पण त्यांनी आताही आपले सर्वसमावेशक नेतृत्व दाखवले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी पहिली मागणी मी केली होती. मात्र ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणाच्या निर्णयाचे समर्थन केले. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला आठवलेंनी पाठिंबा दर्शवला आहे.
मतचोरीच्या आरोपांवर आठवलेंची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप केल्यावर आठवले म्हणाले की, “लोकशाहीत मतदानाची चोरी होणे शक्य नाही. आम्ही आमच्या पराभवाला मतचोरी कारणीभूत आहे, असे कधीच म्हणालो नाही. मतदान प्रक्रियेबाबत राहुल गांधींचे आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत.” राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका करत आठवले म्हणाले, “पंतप्रधान मोदी कधीही राहुल गांधींचे नाव घेत नाहीत, पण राहुल गांधी मात्र 24 तास मोदींवर टीका करत असतात. त्यांनी खूप शक्ती एकत्र करून प्रयत्न केला, पण पंतप्रधान मोदींचा पराभव करू शकले नाहीत असा टोलाही आठवलेंनी लगावला.