पुणे, 8 सप्टेंबर : शहरची उपनगरे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी शनिवारी सुमारे ६ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. मेट्रोने पहिल्यांदाच शहरात एकाच दिवशी एवढी मोठी प्रवासी संख्या अनुभवली तर पूर्ण उत्सवात सुमारे ४० लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर प्रवाशांनी मेट्रोचा मोठा वापर केला. उपनगरांतील नागरिकांनी मेट्रो स्थानकाजवळ त्यांचे वाहन उभे करून पुढे शहरात येण्यास आणि परतण्यास पसंती दर्शविली. शहराच्या मध्यभागातील महात्मा फुले मंडई स्थानकावरून सर्वाधिक म्हणजे ६६ हजार ५४२ प्रवाशांनी प्रवास केला.
त्या खालोखाल डेक्कन जिमखाना स्थानकावरून ६४ हजार ७०३, पिंपरी चिंचवड महापालिका ४८ हजार ३६३, स्वारगेट ४४ हजार ९१७ आणि पुणे महापालिका ३९ हजार २०८ प्रवाशांनी वाहतूक केली. प्रवाशांच्या गर्दीमुळे मेट्रो स्थानके गजबजून गेली होती. रविवारी सकाळीही मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला.