मुंबई, 8 सप्टेंबर : देशात लागू होणाऱ्या नव्या जीएसटी रचनेमुळे दुचाकी बाजारपेठेत मोठा बदल होताना दिसत आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे ३५० सीसीखालील बाइक्स २०,००० रुपयांपर्यंत स्वस्त होणार आहेत. तर दुसरीकडे, ४०० सीसी ते ६५० सीसी क्षमतेच्या मोठ्या बाइक्सच्या किमती २५,००० ते ४०,००० रुपयांपर्यंत महागणार आहेत.
३५० सीसीखालील बाइक्स व स्कूटर्सवरील जीएसटी २८ टक्क्या वरून १८ टक्के करण्यात आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हिरो स्प्लेंडर, होंडा शाइन, टीव्हीएस अपाचे, होंडा अॅक्टिव्हा, टीव्हीएस स्कूटी यांसारख्या लोकप्रिय गाड्या आता परवडणाऱ्या दरात मिळतील. साधारणपणे १ लाख रुपयांची बाइक आता ९०,००० रुपयांत उपलब्ध होईल, तर स्कूटर्सची किंमत जवळपास ८,००० रुपयांनी कमी होणार आहे.
मात्र, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक्सवर जीएसटीचा दर २८ टक्क्या वरून थेट ४० टक्के झाला आहे. यामुळे रॉयल एनफील्ड हिमालयन, गुरिल्ला, सुपर मिटिऑर, इंटरसेप्टर, कॉन्टिनेंटल जीट, ट्रायम्फची स्पीड ४००, बजाज पल्सर एनएस ४०० झेड आणि हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० यांसारख्या बाइक्सच्या किमती झपाट्याने वाढतील. अंदाजानुसार या बाइक्सवर २५,००० ते ४०,००० रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.
रॉयल एनफील्डची क्लासिक ३५०, हंटर, बुलेट, मिटिऑर, तसेच होंडाची एच’नेस सीबी३५० आणि सीबी ३५० आरएस या मॉडेल्स मात्र ३५० सीसीच्या खाली असल्याने त्यांना वाढीव कराचा फटका बसणार नाही. त्यामुळे या गाड्यांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते ही करप्रणाली विरोधाभासी आहे. छोट्या बाइक्सवरील जीएसटी कपात ही सकारात्मक बाब असली तरी मोठ्या बाइक्सवरील वाढीव करामुळे भारताचा जागतिक दुचाकी बाजारातील दर्जा कमी होऊ शकतो. रॉयल एनफील्डचे सिद्धार्थ लाल यांनी याआधी सर्व बाइक्सवर एकसमान १८ टक्के जीएसटीची मागणी केली होती. क्लासिक लेजेंड्सचे अनुपम थरेजा यांनी मात्र छोट्या बाइक्सवरील कपातीचे स्वागत करत ३०० ते ३४९ सीसी इंजिन प्लॅटफॉर्मना थेट फायदा होणार असल्याचे सांगितले.
मोठ्या बाइक्सचा बाजार वेगाने वाढत असताना या नव्या करप्रणालीमुळे विक्रीवर परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षी रॉयल एनफील्डने ३५० सीसीवरील सुमारे १.५ लाख बाइक्स विकल्या, बजाजनेही तेवढ्याच विकल्या, तर ट्रायम्फने दोन वर्षांत जवळपास ७० हजार बाइक्स विकल्या. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, नव्या जीएसटी नियमांमुळे या गाड्यांच्या मागणीत मंदी येऊ शकते.
एकूणच, नव्या जीएसटीमुळे छोट्या बाइक्स खरेदीदारांना दिलासा मिळणार असला तरी बुलेट, ट्रायम्फ, हार्ले-डेव्हिडसन यांसारख्या मोठ्या बाइक्सच्या चाहत्यांना मात्र अधिक खर्च करावा लागणार आहे.