मुंबई, 9 सप्टेंबर : लालबागचा राजा विसर्जन 2025 मधील घडामोडी आता न्यायालयीन चौकटीत गेल्या आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवल्याचे आरोप करून लालबाग राजा मंडळाने हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल 33 तासांनंतर पार पडले. 6 सप्टेंबर दुपारी सुरू झालेली मिरवणूक 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर संपली. विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला, मात्र मूर्तीवर काम करणं अत्यंत किचकट ठरल्याने वेळखाऊ प्रक्रिया झाली.
हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, ‘‘आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबाग राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं. भरती ओहीटीचा अंदाज लालबाग मंडळाला आला नाही. मंडळाने पुढे विसर्जनाची योग्य काळजी घ्यावी.’’
लालबाग राजा मंडळाने स्पष्ट केले की, हिरालाल वाडकर मंडळाशी कधीही संबंधित राहिलेले नाहीत आणि कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केलेले नाही.त्यांनी फक्त प्रसिद्धी आणि बदनामीसाठी चुकीची माहिती पसरवली. यामुळे मंडळाने वाडकर यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.मंडळाने हा निर्णय आज घेतला असून उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी न्यायालयात हा दावा दाखल केला जाणार आहे.
लालबागच्या राजाच्या विसर्जनात भव्य भाविकांची उपस्थिती होती, तरीही 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना संयम धरण्याची गरज भासली. मंडळाने सांगितले की, भविष्यात विसर्जनाची काळजी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात येईल.