पुणे, 9 सप्टेंबर : प्राध्यापक भरती न झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) क्रमवारीत घसरण झाल्याचे कारण सांगून विद्यापीठ प्रशासन जबाबदारी झटकत आहे. हा पुणे विद्यापीठाच्या वैभवशाली परंपरेतील काळा दिवस आहे. त्यामुळे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि अधिसभा सदस्य यांनी तत्काळ सामूहिक राजीनामे द्यावेत,अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली आहे.
एकेकाळी ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी विद्यापीठाची ओळख होती. पण ही ओळख सध्याच्या विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि अधिकार मंडळातील सदस्यांनी धुळीत मिळवली आहे. यंदा विद्यापीठाची क्रमवारी ९१व्या क्रमांकापर्यंत खाली घसरली आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीची जबाबदारी विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाची आहे.
