पुणे, 10 सप्टेंबर : येरवडा कारागृहातील बराकीत झोपण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून रात्री दोघांनी एका कैद्याला खिळ्याने मारहाण केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
संजय भिकाजी कापडे (५२) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याच्यावर कारागृह रुग्णालयात उपचार करण्यात आले. वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भरत विशाल राठोड आणि महम्मद गुलाब शेख या दोघांनी कापडे याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, राठोड व शेख हे न्यायालयीन कोठडीत असून, अद्याप शिक्षा सुनावलेली नाही. झोपण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून राठोड व शेख या दोघांनी कापडे याच्या मानेवर खिळ्याने मारहाण केली. तसेच, त्याच्या छातीत ठोसे मारून गंभीर दुखापत केली.