पुणे, 10 सप्टेंबर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) डेक्कन जिमखाना येथे शहराच्या मध्यवर्ती पेठांना जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात येत असून, या कामासाठी आजपासून महिनाभर भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवर डेक्कन जिमखाना येथे मध्यवर्ती पेठांना जोडणारा पादचारी पूल बांधण्यात येत आहे. गणेशोत्सवात वाहतूककोंडी होत असल्याने भिडे पूल तातडीने सुरू करावा, अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे महामेट्रोकडून २६ ऑगस्ट रोजी भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी भिडे पूल गुरुवारपासून महिनाभर बंद ठेवण्यात येणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. ‘भिडे पूल बंद ठेवण्यात येणार असला, तरी नदी पात्रातील रस्ता हा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी केले.