हाँगकाँग, 10 सप्टेंबर भारताची दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन सुपर 500मध्ये सलामीच्या लढतीतच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला डेन्मार्कच्या बिगरमानांकित लाईन क्रिस्टोफरसनकडून तीन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला.
गेल्या महिन्यात बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलेल्या सिंधूला २१-१५, १६-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. एका तासापेक्षा कमी कालावधीत झालेला हा पराभव २५ वर्षीय डेनविरुद्धचा सिंधूचा मागील पाच विजयांनंतरचा पहिलाच पराभव ठरला आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू सिंधूने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. पहिल्या गेममध्ये ३-१ अशी आघाडी घेतली. १४-१३ पासून तिने क्रिस्टोफरसनला फक्त एक गुण दिला आणि नंतर हा गेम गमावला होता. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने १३-१२ अशी आघाडी घेतली पण तिने सलग पाच गुण गमावले आणि खेळाची गती गमावली.निर्णायक गेम तणावपूर्ण लढाईत बदलला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये क्रिस्टोफरसनने 21-19 ने बाजी मारत सिंधूचे या स्पर्धेतील आव्हान पहिल्यात सामन्यात संपुष्टात आणले. दरम्यान, स्विस ओपन आणि जपान ओपनमध्ये हंगामाच्या सुरुवातीच्या अपयशानंतर सिंधू पुन्हा फॉर्ममध्ये येत असतानाच तिला या मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
