अहमदाबाद, 11 सप्टेंबर : गुजरात सरकारने विधानसभेत स्वीकार केले की गेल्या 2 वर्षांत 307आशियाई सिंहांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सिंहांचे संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारने 37.35 कोटी रुपये खर्च केले होते.
आशियाई सिंह संपूर्ण जगात फक्त गुजरातमध्येच आढळतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या सिंहांच्या मृत्यूमुळे राज्य सरकारच्या संरक्षण धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या 10 दिवसांत 4 सिंह दगावल्याच्या बातम्या आल्या होत्या, ज्यामध्ये 3 बछडे आणि 1 सिंहिण होती. गेल्या 13 मे 2025 रोजी झालेल्या सिंहांच्या सोळाव्या गणनेत गुजरातच्या 7 जिल्ह्यांमध्ये एकूण 891 सिंह आहेत, यामध्ये सर्वाधिक अमरेली (339) जिल्ह्यात आहेत. मात्र, गेल्या 2 वर्षांत 307 सिंह दगावले आहेत.
राज्यात 2023-24 मध्ये 60 सिंह आजारपणामुळे दगावलेत. तर 38 जणे परस्पर संघर्षात गतप्राण झालेत. 24 वृद्धपणामुळे मृत्यूमुखी पडले आणि 7 जणांचा विहिरींत पडून मृत्यू झाला. तसेच 5 सिंह पाणीत बुडून 1 रस्ता अपघातात आणि 1 विजेचा धक्का लागून मरण पवला. तर 2024-25 मध्ये आजारपणामुळे 81 सिंहांचा मृत्यू झाला असून खुल्या विहिरीत पडून 13 सिंह दगावलेत. या सर्व मृत्यूंपैकी सर्वाधिक परिणाम अमरेली जिल्ह्यात दिसून आले, जेथे सर्वाधिक सिंह असूनही, ते त्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे. जानेवारी ते जुलै 2025 या काळात फक्त अमरेली जिल्ह्यात 31 सिंह दगावले, त्यामध्ये 14 शावक होते. या सिंहांपैकी बहुतेकांचा मृत्यू अशा आजारांमुळे झाला, जे वेळेवर उपचार केले असते तर टाळता आले असते.
सरकारचा दावा आणि वास्तव
या मृत्यू असूनही, गुजरात सरकार म्हणते की त्यांनी सिंहांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. 2023-24 मध्ये 20.35 कोटी रुपये आणि 2024-25 मध्ये 17 कोटी रुपये – एकूण 37.35 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र वाढती मृत्यूसंख्या एक वेगळीच कहाणी सांगते.ही समस्या केवळ गुजरातपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे. कारण आशियाई सिंह एक अत्यंत संकटग्रस्त प्रजाती आहेत आणि गुजरात हेच त्यांचे एकमेव नैसर्गिक अधिवास आहे.
सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि त्याची अंमलबजावणी
सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये आदेश दिला होता की आशियाई सिंहांना गिरमधून मध्य प्रदेशमधील कूनो राष्ट्रीय उद्यानात हलवण्यात यावे, जेणेकरून एक स्वतंत्र लोकसंख्या तयार होईल आणि एखाद्या महामारी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सिंहांच्या संपूर्ण अस्तित्वाला धोका निर्माण होणार नाही. पण 12 वर्षांनंतरही, हा आदेश फक्त कागदावरच आहे. गुजरातचे अधिकारी या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यांचा युक्तिवाद आहे की राज्याची संरक्षण योजना यशस्वी ठरली आहे आणि त्यांनी त्यांच्या सिंहांचा अभिमान आहे. ते 2900 कोटींच्या “प्रोजेक्ट लायन” आणि गुजरातमध्येच बर्दा अभयारण्यात सिंह हलवण्याच्या योजनांचा उल्लेख करतात. मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बर्दा अभयारण्याचे लहान आकारमान आणि शिकार प्राण्यांची कमतरता हे आशियाई सिंहांसाठी तेथील अधिवास उपयुक्त ठरत नाही. कूनो हे दीर्घकालीन दृष्टीने अधिक योग्य पर्याय आहे.
