सोलापूर, 12 सप्टेंबर: शहरात रात्री झालेल्या पावसामुळे जुन्या विडी घरकुल परिसरातील जवळपास ५०० घरांमध्ये पाणी शिरले आहे. अवघ्या काही तासांत येथील नागरिकांचे होत्याचे नव्हते झाले. संसार, व्यवसाय मोडून पडल्याने हतबल झालेल्या या नागरिकांच्या डोळ्यात आज दिवसभर केवळ अश्रू दिसत होते. विडी घरकुल ई, एच, जी ग्रुप, तुळशांती नगर, प्रियदर्शनी नगर, तुळजाई भोसले नगर, भारत नगर, ब्रम्हानंद नगर, चाकोते नगर भागातील जवळपास सर्वच घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र जागून काढावी लागली.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विडी घरकुल परिसरातील नागरिकांना बसला. पुराचे पाणी विविध नगरांमधील शेकडो घरांमध्ये शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने हृदयद्रावक आणि भयावह चित्र दिसून आले. गुरुवारी दुपारी तीनपर्यंत पुराचे पाणी ओसरले नव्हते. विडी घरकुल परिसरातील बाधित कुटुंबातील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. अनेक घरातील सर्व सामान, अन्नधान्य आणि कपडे वाहून गेले आहे.