सोलापूर, 12 सप्टेंबर। सोलापूर शहरांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे रेशन च्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मोदी भागामध्ये उघडकीस आली. सर्प मित्र सिद्धेश्वर मिसालेलू आणि शिवसेनेचे जिल्हा युवाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.
मागील दोन महिन्यापूर्वीच दूषित पाण्यामुळे मोदी परिसरात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच भागामध्ये रेशन दुकानांमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क मेलेला साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान ही माहिती सिद्धेश्वर मिसालेलू यांनी सोलापूर शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना फोनद्वारे दिली. त्याने लगेच युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांना ही माहिती दिली तेव्हा साठे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना रेशनच्या तांदळामध्ये मृत साप आणि जिवंत अळ्या दिसून आल्या. तेव्हा साठे यांनी पुरवठा अधिकाऱ्याला तातडीने कळवले.
या भागातील विभागीय अधिकारी प्रफुल्ल नाईक यांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा करून संबंधित तांदूळ जप्त केला आहे.