शिलाँग, 13 सप्टेंबर : मेघालयातील ज्येष्ठ नेते आणि 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे डॉनवा डेथवेलसन लापांग यांचे शुक्रवारी रात्री एका रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. ‘माहे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लापांग यांच्या पश्चात पत्नी एमेथिस्ट लिंडा जोन्स ब्लाह आणि 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी 15 तारखेला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
लापांग दीर्घकाळापासून वयोमानानुसार होणाऱ्या आजारांनी त्रस्त होते आणि त्यांनी शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यावेळी माजी खासदार आणि काँग्रेस नेते व्हिन्सेंट एच. पाला रुग्णालयात उपस्थित होते.
स्वातंत्र्यापूर्व काळात 10 एप्रिल 1932 रोजी जन्मलेले लापांग यांनी 1972 मधील विधानसभा निवडणुकीत नोंगपोह मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवून राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी 1992 ते 2010 या काळात 4 वेळा मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी जोडलेले राहिले. मात्र, 2018 साली त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये (एनपीपी) प्रवेश केला आणि राज्य सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यरत होते.