सिन्नर, 14 सप्टेंबर। येथील खडांगळी येथे शनिवारी सायंकाळी दीड वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने त्या बालकाला झोळीतून ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात जखमी बालकाचा मृत्यू झाला. गोलू युवराज शिंगाडे असे मृत बालकाचे नाव आहे.
पेठ तालुक्यातून शेतीकामासाठी आलेल्या मजुराचे हे बालक आहे. खडांगळी येथील शेतकरी अर्जुन संपत कोकाटे निमगाव देवपुर शिवारात राहतात. त्यांच्या चाळीमध्ये काही कोकणी कामगार राहतात. यावेळी कामगार मका कामासाठी शेतामध्ये गेले होते. यावेळी बिबट्याने दबा धरून चाळीमध्ये प्रवेश करून झोळीमध्ये झोपलेल्या बालकाला २०० मीटर असलेले उसाच्या शेतात उचलून नेले. त्यात त्या बालकाचा मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्याची दहशत ही दिसून येत आहे. सिन्नर तालुक्यामध्ये मागील आठवड्यात रविवारी सात सप्टेंबर रोजी पंचाळे येथील सारंग गणेश थोरात या दहा वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दुसर्या बालकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील नासिक रोड परिसरामध्ये जय भवानी रोडवर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास बिबट्याने एका तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वृंदावन पार्क, लवटे नगर येथे राहणारे जितू वराडे हे इमारतीच्या पायऱ्या उतरत असताना समोर अचानक बिबट्या आल्याने क्षणभर घाबरले. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी झपाट्याने पळ काढून आपला जीव वाचवला.
वनविभागाने विविध उपाय योजना करून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मात्र अद्यापही बिबट्या सापडलेला नाही.