छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील खामगांव, नागझरी, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगांव आणि गंगावाडी शिवारातील नुकसानग्रस्त शेतकर्यांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी पुरग्रस्त भागातील नुकसानीची तपशिलाने माहिती अजित पवार यांना दिली. जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारे अतिरिक्त पाणी आणि अतिवृष्टीमुळे सातत्याने गोदाकाठच्या गावातील नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते.
सव्वा लाख क्युसेस पाण्याचा नदीपात्रात विसर्ग झाल्यानंतर या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सातत्याने जोडरस्त्यावरील पुलांची उंची वाढविणे आणि पुररेषेतील कुटूंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी सरकारकडे करत आहोत. मागील अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला.