मुंबई, 17 सप्टेंबर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दादरमधील शिवाजी पार्क परिसरात दिवंगत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याच्या प्रयत्नाची टीका केली आहे. काही अज्ञातांनी पुतळ्याला लाल रंग फासण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे, या घटनेची निंदा करून चालणार नाही तर तपास व्हायला हवा. यामागे दोनच प्रकारच्या व्यक्ती असू शकतात – ज्यांना आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा बेवारस माणसाने केले असेल किंवा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असेल.”
त्यांनी यावेळी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून आरोपीला त्वरित पकडण्याची मागणी केली आहे. घटना समोर आल्यानंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलीस सध्या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.