सोलापूर, 18 सप्टेंबर। आयटी पार्कसाठी जागेची शोधमोहीम थांबली असून, आता पाहणी केलेल्या जागांपैकी चार जागांचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामध्ये एनजी मिलची जागा, होटगी पाझर तलावाशेजारील खुली जमीन, विद्यापीठाशेजारी हिरज हद्दीतील खुली जागा व कोंडी येथील जागेबाबत परिपूर्ण माहिती संकलित करण्यात येत आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘योग्य जागा सुचवा, त्यावर आयटी पार्क उभारू’ असे आश्वासन सोलापुरातील एका जाहीर कार्यक्रमात दिले होते. तशा सूचना प्रशासनाला दिल्या. त्यानुसार प्रशासनाने शहराच्या शेजारील तसेच शहरातील शासकीय व खासगी जागेचा शोध सुरू केला होता. त्यानुसार कमी वेळेत व कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या शासकीय जागांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.