सोलापूर : कोरोना काळात अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने प्रवाशांकडून रेल्वे सेवांच्या मागणीत होणारी वाढ पाहता सिद्धेश्वर, इंद्रायणी व इंटरसिटीबाबतच्या गाड्या सुरू करण्याबाबतचा मोठा निर्णय १५ सप्टेंबरनंतरच्या टप्प्यात होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वे मंत्रालय हे कोणत्या गाड्या सुरू करावयाच्या याबाबत संबंधित राज्याशी समन्वय साधत आहे. वाढत्या कोरोनामुळे या गाड्या सुरू होण्यास विलंब होत आहे. कोणत्या शहराला किती रेल्वे फे-यांची आवश्यकता आहे, हे निर्धारित करण्यात येईल. याबाबतचा आढावा घेतल्यानंतरच रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय होईल. येत्या काळात सणासुदीच्या दिवसांचं सत्र सुरू होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या. अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीयसह खासगी कार्यालये सुरू झाली. त्यामुळे साहजिकच सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणा-या गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली आहे. रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या. मात्र त्या गाड्यांची वेळ व कामाची वेळ यात मोठा फरक होता. इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्वर एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा रेल्वे प्रवासी संघटनांसह सर्वसामान्य प्रवाशांना लागून राहिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजना, करण्यात आलेली विविध कामे, दुहेरीकरण, विद्युतीकरण, श्रमिक ट्रेन, मालवाहतूक, किसान रेल, रो-रो रेल्वे सेवा यांसह विविध उपक्रमांविषयी विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक प्रदीप हिरडे उपस्थित होते.
* ३५ हजार कामगारांना घरी पोहोचविले
कोरोनाकाळात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून परप्रांतीयांना त्यांच्या मूळ घरी पोहोचविण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोलापूर विभागाने ३० ट्रेनद्वारे ३४ हजार ७६१ कामगारांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात यश मिळविले. सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, कलबुर्गी, अहमदनगर, दौंड, शिर्डी या स्थानकांवरून या श्रमिक ट्रेन धावल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी दिली.