छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर। काही जण हंबरडा फोडायची भाषा करत असले तरीही त्यांना शेतकऱ्यांची साथ मिळणार नाही, कारण विरोधकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त अशी ३२ हजार कोटींची मदत आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी कडाडून टीका करताना सांगितले की, २०२२ साली खुर्ची गेली, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत लोकांनी पाठ फिरवली, आणि विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवून वीसच जागांवर जेमतेम विजय मिळाला, तेव्हा त्यांनी हंबरडा फोडला होता. आता मुंबई मनपा निवडणुका जवळ येत असून या निवडणुकीत पराभव झाल्यावर फोडण्यासाठी थोडा हंबरडा त्यांनी शिल्लक ठेवावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना गटप्रमुखांची कार्यशाळा आणि पक्षाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले.
“आम्ही घरात बसून नाही, तर प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे आहोत, त्यामुळेच ब्रिटनचे पंतप्रधान आमच्याशी बोलतात, तर काही जण लंडनच्या फेऱ्या मारून सगळे तिथेच सर्व ठेवून रिकाम्या हातांनी परततात,” असे याप्रसंगी असे निक्षून सांगितले.
राज्यातील आपत्ती, पूरस्थिती किंवा अडचणीच्या काळात शिवसेना नेहमी पुढे असते. पूरग्रस्त भागांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले असून मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाला चालना दिली. महायुतीची पहिली कॅबिनेट बैठकही मराठवाड्यातच झाली होती त्यातही अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी देखील केली असल्याचे यावेळी सांगितले.
आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होताना शिवसैनिकांनी मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करावा. या निवडणुकांसाठी पक्षाने विशेष ॲप लाँच केले असून त्याची माहिती करून घ्यावी. प्रत्येक विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, आमदार, खासदारांनी त्यानुसार प्रत्यक्ष सर्वेक्षण करावे असे आवाहन याप्रसंगी केले.
याच मेळाव्यात विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार विलास भुमरे, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, शहरप्रमुख राजेंद्र जंजाळ तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.